2016 च्या फेब्रुवारी महिन्यातील गोष्ट आहे. आमच्या जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव-तिल्लीची नागपूरच्या `फन अन्ड फूड पार्क’ मधे सहल नियोजित करण्यात आली होती. `अम्युझमेंट पार्कला जायचं’ या कल्पनेनेच मुलं- मुली आनंदाने बागडत होती. खंतर गोंदिया जिल्ह्यातील या आमच्या शाळेतून एक खास बस करून नागपूरला जावं, असा आम्हां शिक्षकांचा विचार होता. मात्र आमचे गाव लहान आहे, या गावातील मुलांचे पालकही फारसे श्रीमंत नाहीत. त्यामुळे सहलीसाठी फारशी मुलं-मुली जमू शकली नाहीत. त्यामुळे जमलेल्या मुला-मुलींना तीन-चार कार मधून घेऊन आम्ही नागपूरला गेलो. मुलं संख्येने कमी असली तरी त्यांचा उत्साह मात्र दांडगा होता. अम्युझमेंट पार्कच्या वेगवेगळ्या राईड्स, पाळणे, खेळ, कृत्रिम समुद्राच्या लाटा हे सगळं बघून मुलं हरखून गेली. मुलांनी आरडा-ओरडा करीत प्रत्येक राईडचा आनंद घेतला. कंटाळा येईपर्यंत मुलं खेळत होती, आम्हां शिक्षकांनाही ओढून नेत राईडमधे बसायला भाग पाडत होती.
नागपूरला जाता-येता गप्पागोष्टी करीत, गाणी म्हणत आम्ही सहलीचा आनंद घेतला. नागपूरच्या सहलीत इतकी मजा आली की सहलीवरून आल्यानंतर सुद्धा आम्ही सगळे सहलीविषयीच भरभरून बोलत होतो. नागपूरच्या ‘फन अन्ड फूड पार्क’ मधे केलेल्या गमतीजमती, वेगवेगळ्या राईड्सची मजा, तिथे खाल्लेला खाऊ असं सगळं मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत सहावीच्या वर्गातही बोलत होतो. सहलीला आलेले विद्यार्थी या सगळ्या मजेविषयी सांगत होते आणि सहलीला न येऊ शकलेले विद्यार्थी हे सगळं डोळे विस्फारून ऐकत होते. मी एकदम म्हणून गेलो, “तुमच्यासोबतच आम्हां शिक्षकांना पण खूप मजा आली. असं वाटतंय की दरवर्षी जावं त्या फन अन्ड फूड पार्कला!” असं म्हणून मी वर्गावर नजर फिरविली, मुलांनीही टाळ्या वाजवून माझ्या बोलण्याला दाद दिली. पण याच वर्गात शिकणारी नेहा मात्र एकीकडे टाळ्या वाजवीत होती तर दुसरीकडे नेहाच्या डोळ्यातून अश्रू ओघळीत होते.
“नेहा बेटा, काय झालं? का रडून राहिलीस?” मी नेहाला प्रश्न विचारला. नेहा काहीच बोलायला तयार नव्हती. मग तिच्या मैत्रिणीही नेहाजवळ गेल्या, तिची विचारपूस करू लागल्या. मी ही नेहाजवळ गेलो, तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरविला आणि पुन्हा विचारलं, “काय झालं बेटा? रडू नकोस, बोल बरं” तिला थोडं पाणीही प्यायला दिलं. “सर, मलापण सहलीला यायचं होतं. तुम्ही सगळ्यांनी खूप मजा केली…मी पण आली असती, तर खूप मजा केली असती. पण मला घरून पैसे नाय मिळाले…” असं म्हणून नेहा पुन्हा हुंदके देऊन रडायला लागली. मलाही एकदम वाईट वाटले. “नेहा बेटा, असं रडू नये. तुला पुढच्या वर्षी नक्की सहलीला नेणार, तू पण मजा करशील मग आमच्याबरोबर!” असं तात्पुरतं बोलून मी नेहाची समजूत काढली. तिला पूर्ण शांत केल्यानंतरच मी माझ्या जागेवर परत आलो.
यापुढे वर्गाच्या समोर सहलीतल्या मौजमजेचा विषय किमान आठवडाभर तरी काढायचा नाही असा निश्चय मी केला. नेहासारखी जी मुलं गरिबीमुळे सहलीला येऊ शकली नाहीत, त्यांना हे सगळं ऐकून नक्कीच वाईट वाटत असणार. मला नेहाची फारच दया येऊ लागली. बिचारी नेहा, तिच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे.
त्यातून गेल्या वर्षी तिच्या आई-वडिलांचा वाद झाल्याने ती तिच्या मामाकडे म्हणजे मोहगाव तिल्ली येथे राहायला आली होती. तिच्या मामांचेही हातावर पोट. आमच्या शाळेत मात्र नेहा नियमित येत होती. तिला शाळा आणि मित्रमैत्रिणी खूप आवडतात. मात्र तिला सहलीला पाठवावे इतके पैसे तिची आई किंवा मामा भरू शकले नव्हते. पण या वयात आपणही मित्र-मैत्रिणींसोबत सहलीला जावे, मौजमजा करावी, चांगलेचुंगले खावे असे प्रत्येक मुला-मुलीला वाटणे अगदी साहजिक आहे. मात्र दारिद्र्यामुळे नेहासारख्या चिमुरड्यांच्या इच्छा अपूर्णच राहतात. यात त्यांच्या पालकांचे चुकते, असे मला म्हणवत नाही. कारण ग्रामीण भागात अनेक पालकांचे हातावर पोट असते. कुणी शेतावर मोलमजुरी करतात तर कोणी वीटभट्टीवर कामाला जातात. त्यामुळे सहलीसारख्या मौजमजेसाठी खिशातून एकरकमी चारशे-पाचशे रूपये देणे त्यांच्यासाठी अशक्यच असते.
मी सातत्याने दोन दिवस नेहाचाच विचार करत होतो. नेहासारख्या आणखीही काही विद्यार्थ्यांना गरिबीमुळे सहलीला येता आले नव्हते. `आनंद मिळवणे’ हे निरोगी बालपणासाठी फार महत्त्वाचे असते. म्हणूनच कुणाची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी सगळ्या विद्यार्थ्यांना सहलीला येता यायला हवे, असं माझं मन सांगत होतं. मी शेवटी हाच विषय माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसमोर माडंला. “वर्गातली सगळी मुलं-मुली सहलीला आली पाहिजेत असं तुम्हांला वाटतं का? सगळ्यांकडे पैसे असोत किंवा नसो, सगळ्यांनाच सहलीचा आनंद घेता यायला हवा, असं मला वाटतं. तुम्हांला काय वाटतं.” मी हे विचारण्याचा अवकाश की सगळे विद्यार्थी एकसुरात ओरडले “हो, आम्हांला सहलीत सगळे मित्र- मैत्रिणी सोबत हवे आहेत”. वर्गातल्या काही जणांनी सांगितलं, की नेहा त्या दिवशी सहलीला न येऊ शकल्यामुळे रडली, त्याचे आम्हांलाही वाईट वाटले. नेहासोबत आणखीही काही जण सहलीला येऊ शकले नाहीत. पुढच्या वर्षी मात्र सगळेच सहलीला यायला हवेत. वर्गातला कुठलाही मुलगा- मुलगी सहलीच्या आनंदापासून वंचित राहायला नको. पण हे करायचे कसे, हा देखील मोठा प्रश्न होता.
यावरही मुलांनी चर्चा सुरू केली आणि मुलांनीच उपायही सुचविला, “सर, सहलीसाठीचे पैसे आपण वर्षभर आधीपासून साठवले तर?” विद्यार्थ्यांनी खूपच चांगला उपाय सुचविला होता. मात्र पैसे आणायचे कुठून हे त्यांना कळत नव्हतं, तो प्रश्न मी सोडवून टाकला. “मुलांनो आपण `सहल निधी’ म्हणजेच `पिकनिक फंड’ सुरू करूयात. तुम्हांला महिन्यातून किमान एकदा-दोनदा खाऊचे पैसे मिळतात ना? त्या पैशांनी बाहेरचा खाऊ विकत घेऊ नका. बाहरेचे पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असतात. शिवाय घरात कोणी पाहुणे आले तर परत जाताना ते ही तुमच्या हातावर खाऊसाठी 25- 30 रूपये ठेवत असतीलच. हे सगळे पैसे आपण आपला सहल निधी म्हणून जमा करूया, म्हणजे पुढच्या वर्षी सगळ्या मुलांना सहलीला येता येईल.” माझा प्रस्ताव मुलांना आवडला आणि टाळ्या वाजवून या `सहल निधी’च्या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले.

आणि 1 मार्च 2016 पासून आमचा `सहल निधी’चा उपक्रम सुरूही झाला. “घरून खाऊसाठी मिळतील तेवढेच पैसे आणून निधीत जमा करायचे, कोणीही `पैसे द्याच’ म्हणून पालकांकडे हट्ट करायचा नाही. प्रत्येकाने पैसे आणावेत अशी जबरदस्ती नाही. ज्यांना जमेल त्यांनीच आणावेत” अशा स्पष्ट सूचना मी वर्गाला दिल्या. आणि मुलं खरोखरच घरून मिळणारे 5-10 रूपये निधीत जमा करण्यासाठी आणायला लागली. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी मी एक नवीन हजेरीपत्रकाची नोंदवही आणली. त्यात वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नावे आणि कोणत्या तारखेला त्यांनी किती पैसे जमा केले, याची नोंद ठेवली आहे. मुलांचे पैसे जमा करण्यासाठी एक प्लास्टिकचा चौकोनी बॉक्सही विकत घेतला, त्यावर `सहल निधी/ पिकनिक फंड’ असं स्केचपेनने रंगवून त्यात पैसे जमविणे सुरू आहे.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही पसंत पडला आहे. कारण एकरकमी मोठी रक्कम देण्याऐवजी 10-20 रूपये देणे त्यांना सहज शक्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी आता बाहेरचे अरबट-चरबट पदार्थ विकत घेण्यासाठी पालकांनी दिलेले पैसे खर्च करीत नाहीत. ते पैसे थेट शाळेत जमा करतात आणि चांगल्या प्रकारे जेवतात. त्यामुळे मुलांचे आरोग्यही चांगले राहते. शिवाय लहानपणीपासूनचलेखन मुलांना बचतीची सवयही लागली आहे.
आमच्या ‘पिकनिक फंड’च्या उपक्रमाला पाहता पाहता एक वर्ष पूर्ण झालंय. आमच्या सहल निधीमधे फेब्रुवारी 2017 पर्यंत तब्बल 13 हजार रूपये जमा झालेले आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे नेहाने सुद्धा या ‘सहल निधी’मधे जवळपास चारेकशे रूपये जमा केले आहेत. नेहा आणि तिच्यासोबतचे सर्व विद्यार्थी आता सातवीत आहेत. नेहाची आईही आता तिच्या पतींसोबतच राहते आहे. त्यांचे गाव मोहगाव तिल्लीपासून जवळच आहे. मात्र नेहाला ही शाळा खूपच आवडल्याने ती मामांकडेच राहून याच शाळेत पुढील शिक्षण घेते आहे.

नेहाला गेल्या वर्षी दिलेले वचन आम्ही शिक्षकांनी पूर्ण केले आहे. यावर्षी सातवीतील सर्वच्या सर्व 35 विद्यार्थ्यांनी सहलीसाठी छत्तीसगडच्या भिलाईमधील ‘मैत्री बागे’ला भेट दिली. मैत्री बागेमधील हिरवळ आणि फुले, संगीताच्या तालावर डोलणारी कारंजी, छोटीशी टॉय ट्रेन आणि प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना न्याहाळण्याचा मनसोक्त आनंद मुलांनी घेतला. मोर, साळिंदर, हरीण असे वेगवेगळे प्राणी- पक्षी बघताना मुले हरखून गेली.

बहुतेक सर्व विद्यार्थ्यांचा खर्च त्यांनी वर्षभर केलेल्या बचतीमधूनच भागला. ज्या एक- दोन विद्यार्थ्यांची फारशी बचत झालेली नव्हती, त्यांचे पैसे आम्ही शिक्षकांनी मिळून भरले. त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे सर आणि इतर सर्व सहकारी शिक्षकांनी मदत केली. यापूर्वी कधीच सहलीला न आलेल्या नेहाच्या आणि तिच्यासारख्या इतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यातला आनंद हा मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा जास्त महत्त्वाचा वाटतो. यावर्षी सहलीच्या आनंदापासून सातवीच्या वर्गातील एकही विद्यार्थी वंचित राहिला नाही, याचा आम्हांला आनंद आहे.
ब्लॉग: अशोक चेपटे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्ली, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया
संपादन: समता.शिक्षा टीम