शाळेच्या प्रांगणात उंच उभारलेली गुढी, सजविलेल्या बैलबंडीतून मुलांची निघालेली मिरवणूक, मुलांच्या डोक्यावरच्या रंगीबेरंगी टोप्या, हातात पकडलेले रंगीबेरंगी फुगे आणि पुष्पगुच्छ स्वीकारून स्मितहास्य करणारे पालक या दृश्याची गोंदिया जिल्ह्याला आता सवय झालेली आहे. राज्यात सर्वत्र पहिलीच्या मुलांचे प्रवेश जून महिन्यातच होतात, गोंदियामधे मात्र विद्यार्थी मार्च महिन्यात गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर पहिलीत दाखल होतात. यावर्षी म्हणजेच 28 मार्च 2017 रोजी तर गोंदिया जिल्ह्यात गुढीपाडव्यादिवशी तब्बल 10,922 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या अभिनव उपक्रमाचे नाव आहे ‘गुढीपाडवा – शाळा प्रवेश वाढवा’!!

2015-16 च्या शैक्षणिक वर्षापासून या अभिनव उपक्रमाची सुरूवात झाली. तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी मा. डॉ. विजय सूर्यवंशी सरांच्या संकल्पनेतून या प्रवेशगुढी उपक्रमाचा प्रारंभ झाला. सूर्यवंशी सरांनी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना आणि आमच्या सहयोग शिक्षक मंचच्या सदस्यांना बोलावून या उपक्रमाची संकल्पना समोर मांडली. सरांनी आधी कोल्हापुरातही अशा प्रकारचा प्रयोग केला होता. भरमसाठ फी उकळणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण कमी करून चांगले शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद शाळांकडे पालकांना आकृष्ट करण्यासाठी आपण हा नवा उपक्रम राबवूया, असे आवाहन त्यांनी आणि शिक्षणाधिकारी मा. उल्हास नरड यांनी केले. त्यांच्या आवाहनाला आम्ही सर्व शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि एका अभिनव उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद शाळांकडे प्रवेशाचा ओघ सुरू झाला.
या उपक्रमातंर्गत गुढीपाडव्याच्या आधी दहा दिवस गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आपापल्या गावात शाळेत पहिलीत दाखल होऊ शकतील अशा मुला- मुलींची माहिती काढतात. त्यानंतर या मुला- मुलींची यादी गावातील चावडीत, ग्रामपंचायतीजवळ किंवा एखाद्या मंदिरात लावली जाते. त्यासोबतच या मुलांना गावातील जिल्हा परिषद शाळेतच घालावे, असे नम्र आवाहन केले जाते. शिवाय शिक्षक घरोघरी फिरून जिल्हा परिषद शाळांत सुरू असलेल्या अभिनव उपक्रमांची माहिती देत असतात. गोंदिया जिल्हयातील सर्व 1048 शाळा या सेमी इंग्रजी माध्यमाच्या झालेल्या असून सर्व शाळा डिजिटल आहेत. शिवाय शाळांमधे मुलांना न रागावता, न मारता ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीतून त्यांच्या कलाने शिक्षण दिले जाते. शिवाय खेळायला मैदान, बागा, वाचायला भरपूर पुस्तकं हे आकर्षण आहेच.
जिल्हा परिषद शाळांमधे सुरू असलेल्या या उपक्रमाची माहिती ऐकून पालकही खुष होतात. शिवाय हे उपक्रम खरेच सुरळीत चालू आहेत का, आपल्या पाल्याची प्रगती कशी सुरू आहे, हे सर्व तपासण्यासाठी पालकांनी शाळेला वारंवार भेट द्यावी, अशी विनंतीही आम्ही शिक्षक करतो.आमच्या या प्रयत्नांना गेल्या दोन वर्षांपासून चांगले यश मिळते आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा असलेला ओढा कमी होत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भरमसाठ फी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या नावाखाली प्रत्येक वेळी पालकांच्या खिशाला लागणारी कात्री हे आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधे मात्र अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कमीतकमी खर्चात केले जातात. शिवाय शाळेत प्रवेश घेताना कसलेही डोनेशन अथवा फी भरावी लागत नाही. शिवाय घरापासून जवळच असलेल्या शाळेत विद्यार्थी इंग्रजीचे सुद्धा उत्तम शिक्षण मिळवू शकतात, यावर पालकांचा विश्वास आहे. कारण याच शाळांमधे शिकणाऱ्या गावातील इतर विद्यार्थ्यांची प्रगती ते पाहू शकतात.
पालकांना पटवून झाले की प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या दिवशी शाळेत अतिशय उत्साहाने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत होते. जिल्ह्यात सर्वत्र नव्याने पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची आणि शाळेत सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशफेरी निघते. विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी टोप्या दिल्या जातात. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना फुगे आणि रंगीत फुले दिली जातात. ‘गुढीपाडवा- शाळाप्रवेश वाढवा’, ‘आमचा ध्यास- गुणवत्ता विकास’, ‘साडेपाच वर्षांचे मूल, दाखल करा, दाखल करा’ अशा घोषणा उत्साहात देत गावातून विद्यार्थी आणि शिक्षकांची प्रवेशफेरी निघते. आमच्या मोहगाव तिल्ली जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतर्फे तर केळीच्या पानांनी, आंब्याच्या तोरणांनी आणि फुग्यांनी सजविलेल्या बैलबंडीतून पहिलीतील मुलांची प्रवेशफेरी निघते. गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. तिलकचंद बोपचे यासाठी खास बैलबंडी उपलब्ध करून दिली आहे. शाळेचे ढोलपथक आणि घोषणांनी गावाचा परिसर दणाणून सोडला जातो.

त्यानंतर ही प्रवेशफेरी शाळेत पोहोचते. तिथे पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांचे औक्षण करून स्वागत केले जाते. त्यानंतर गावातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांच्या मंत्रिमंडळाच्या हस्ते शाळेत प्रवेशगुढी उभारली जाते. गावातील लोकांकडून मुलांना खाऊचे वाटप होते किंवा शाळेतच सर्व विद्यार्थ्यांना गोडाचे जेवण दिले जाते. त्यानंतर आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत दाखल केल्याबद्दल पालकांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातो आणि विद्यार्थ्यांचा प्रवेशसोहळा पार पडतो. २०१७ मध्ये आमच्या शाळेत 18 विद्यार्थी पहिलीच्या वर्गात दाखल झालेले आहेत. त्यानंतर शाळा एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुरूच असतात मात्र पहिलीच्या लहानग्या विद्यार्थ्यांना शाळेत बसून राहण्याची सक्ती केली जात नाही. त्यांना हसत- खेळत शाळेत रमविण्याचा आणि शाळेच्या परिसराची ओळख करून देण्याचा मात्र पूर्ण प्रयत्न सुरू असतो. त्यानंतर जूनपासून हे विद्यार्थी नियमित शाळेत येतातच.
यावर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने या ‘गुढीपाडवा- शाळा प्रवेश वाढवा’ उपक्रमाची विशेष वेगळी जाहिरात केली होती. त्याबद्दल बोलताना शिक्षणाधिकारी मा. उल्हास नरड साहेब म्हणाले, “गोंदियातील जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडावेत यासाठी झटत आहेत. प्रत्येक शाळा काही ना काही वेगळा उपक्रम करू पाहतेय. जिल्ह्यातील सर्व शाळा 100 टक्के ज्ञानरचनावादी आणि डिजिटल झालेल्या आहेत. गुणवत्तेत आमच्या शाळा कुठेच मागे नाहीत. शिवाय सेमी इंग्रजी माध्यमातून इंग्रजीचेही उत्तम ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत आहे. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नावे – आम्हीही जिल्हा परिषद शाळेतच शिकलो. आम्हांला सार्थ अभिमान आहे- जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा! अशा आशयाच्या जाहिरातींचे फ्लेक्स लावण्यात आले होते. खरोखर शोध घ्यायला गेले तर बहुतांश सनदी अधिकारी हे जिल्हा परिषद अथवा मनपाच्या शाळेतून शिकलेलेच असतात. त्यामुळे तुम्हांला गुणवत्ता पाहिजे असेल तर जिल्हा परिषद शाळांना पर्याय नाही, हे आम्ही लोकांवर ठसविण्याचा प्रयत्न करीत आहोत. शाळेत शिक्षण मोफत मिळते अथवा माध्यान्ह भोजन मिळते, यापेक्षा आमच्या शाळेत तुमचा पाल्य नक्कीच प्रगती करेल, अशी जाहिरात करण्यात आम्हांला जास्त रस आहे.”

गोंदियाच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधे शहरातील श्रीमंत शाळेप्रमाणे ‘समर कॅम्प’ (उन्हाळी शिबिर) चे आयोजन केले जाते. यंदा त्याचे नाव ‘संस्कार शिबिर’ असे ठेवण्यात आले आहे. 14 एप्रिलपासून सुरू होणारे हे शिबिर 9 मे पर्यंत सुरू असते. डॉ. आंबेडकर जयंतीरोजी या शिबिराची सुरूवात होते. रोज सकाळी दोन तास हे शिबिर चालते. त्यात सुंदर हस्ताक्षर, गणिताचे खेळ, कलाकुसरीच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ, पर्यावरणाची काळजी, वृक्षारोपण, बैठे खेळ, कराटे, घोडेस्वारी सारख्या खेळांचे प्रशिक्षण पालकांकडून कसलीही फी न घेता दिले जाते. अपंग विद्यार्थ्यांना (Children with special abilities) त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काही कलागुणांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात अगरबत्ती, पायपुसणी बनविणे, झेरॉक्स मशिन चालविणे या पूरक व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते.
यावर्षी गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सी. एल. पुलकुंडवार यांच्या ‘हो, आम्हांला सार्थ अभिमान आहे जिल्हा परिषद शाळेत शिकल्याचा!!’ या फ्लेक्स बोर्डच्या जाहिरातींचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला. 2016 यावर्षी, या उपक्रमाद्वारे 9000 विद्यार्थी पहिलीत दाखल झाले होते तर यावर्षी 10,922 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीकरिता प्रवेश घेतला.
अशाप्रकारे गोंदियाने राज्यभरात आपला वेगळा प्रवेश पॅटर्न रूजविलेला आहे.
ब्लॉग: अशोक चेपटे, पदवीधर शिक्षक, जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोहगाव तिल्ली, तालुका गोरेगाव, जिल्हा गोंदिया
संपादन: समता.शिक्षा टीम