
जालन्यातील एका शाळेचा दुसरीचा वर्ग. वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वत:चा टॅब आहे. या चिमुरड्या मुलांना टॅब व्यवस्थित हाताळता येतो. कुणी त्या टॅबवर पक्षी–प्राण्यांची चित्रे पाहून इंग्रजी आणि मराठी नावं सांगतोय, तर कोणी अ ते ज्ञ अक्षरे जोडून चित्र तयार करतंय. थोड्या वेळाने सर टॅबवर बालभारतीच्या पुस्तकातल्या कविता लावायला सांगतात. त्यातले अॅनिमेशन पाहत–पाहत पूर्ण वर्ग ती कविता चालीवर म्हणतोय. तुम्हांला वाटेल की ही जालना शहरातील कोणतीतरी खाजगी शाळा असेल, पण तसे नाहीए. ही आहे घनसावंगी तालुक्यातील बोररांजणी जिल्हा परिषद शाळा.
बोररांजणीच्या या जिल्हा परिषद शाळेतील दुसरीचा वर्ग ‘टॅब क्लास‘ झालेला आहे, शाळा तर डिजिटल आहेच. पण महत्त्वाचे म्हणजे या शाळेतील पालकांनी स्वत: आर्थिक मदत द्यायची तयारी दाखवीत हा वर्ग ‘टॅब क्लास‘ केलेला आहे. त्याबद्दल बोलताना वर्गशिक्षक सचिन काटे सांगतात, ‘2016 च्या दिवाळीनंतर आम्ही शाळा डिजिटल करण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्यासाठी लोकवर्गणी गोळा करणे सुरू होतेच. मला स्वत:ला तंत्रज्ञानाची आवड आहे आणि राज्याच्या टेक्नोसॅव्ही टीचर्स ग्रुपचा मी सभासदही आहे. पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची हुशारी माझ्या लक्षात आली होती. ते जानेवारीमध्येच अगदी 10 पर्यंतचे पाढेही म्हणू शकत होते, मग या विद्यार्थ्यांना शिकविताना जर तंत्रज्ञानाची मदत घेतली, तर हे विद्यार्थी किती प्रगती करतील, असे माझ्या मनात यायचे.’

पुढे बोलताना काटे सर म्हणतात, ‘माझ्या विचाराला मुख्याध्यापकांनीही अनुमोदन दिले. मग उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी 2017 च्या एप्रिल महिन्यात हाच विचार मी तेव्हा पहिलीत असणाऱ्या पालकांच्या सभेत बोलून दाखवला. राज्यात अनेक ठिकाणी टॅब स्कूल चालू असून तिथले विद्यार्थी उत्तम प्रगती करीत आहेत, हेही सांगितले. परतूरच्या एका शिक्षकांचा टॅब सोबत आणला होता, त्यावर अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक दाखवले, विद्यार्थ्यांनाही ते हाताळायला दिले आणि टॅब क्लाससाठी लोकसहभागाचे आवाहन केले.’
शाळेला सुट्टी जरी लागली तरी हे शिक्षक पालकांच्या संपर्कात होते आणि काटे सरांची इच्छा पूर्ण झाली, जवळपास दीड लाख रुपयांचा लोकसहभाग फक्त पहिलीच्या वर्गाच्या पालकांमधून उभा राहिला!! मग शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उत्तम दर्जाचे टॅब विकत घेतले. शिवाय त्यात दुसरीचा संपूर्ण ऑनलाईन अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमाला पूरक ठरणारे व्हिडिओ आणि खेळ फीड केले. शिवाय प्रत्येकी 16 जीबीचे मेमरी कार्ड, यूपीएस असा खर्च धरून, त्या दीड लाख रुपयांत दुसरीचा संपूर्ण वर्ग ‘टॅब क्लास‘ झाला.

इयत्ता दुसरीतील मुलं वर्गात वह्या– पुस्तकांऐवजी टॅब वापरतात हे बोररांजणी गावासाठी नवलच होतं. पण जून 2017 पासून दुसरीच्या वर्गातील 24 विद्यार्थी टॅबवर शिकू लागले. काटे सर सांगतात, ‘शहरापासून खूप दूर असलेल्या आमच्या शाळेत विद्यार्थी टॅबवर शिकत आहेत हे पाहून पालकांना फार समाधान वाटते. अर्थातच हे पालकांच्या सहकार्यानेच शक्य झाले आहे. विद्यार्थी फक्त ग्रामीण भागातील आहेत म्हणून ते तंत्रज्ञानापासून दूर राहायला नकोत, असे आम्हांला वाटते. दुसरीसारख्या लहानशा वयोगटात असणारे आमचे विद्यार्थी टॅब अतिशय सराईतपणे हाताळतात. शिवाय अॅनिमेटेड अभ्यासक्रम आणि रंजक शैक्षणिक खेळ, व्हिडिओज असल्याने त्यांचा अभ्यासातला रस चांगलाच वाढला आहे.’
बोररांजणीची शाळा डिजिटल करण्यासाठीही ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले आहे. ग्रामस्थ, शिक्षक, पालक असा मिळून सुमारे अडीच लाखांचा निधी उभारला गेला आहे. काटे सर सांगतात, ‘बोररांजणी गावातील सुमारे 60 टक्के लोक सधन शेतकरी आहेत, तर उरलेले चाळीस टक्के लोक शेतमजूर, वीटभट्टी कामगार किंवा छोटे शेतकरी आहेत. शाळा डिजिटल करायची ठरविल्यानंतर या कामाला सर्वांचे सहकार्य लागणार हे ठाऊक होते, पण ज्याच्या त्याच्या आर्थिक ऐपतीनुसार लोकांनी मदत द्यावी असे आवाहन आम्ही केले. 2016 च्या दिवाळीनंतर सर्वप्रथम तहसीलदार मा. कैलास अंदिल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक ग्रामसभा झाली, त्यात डिजिटल शाळेसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले.’
या सभेला चांगला प्रतिसाद लाभला. कारण सभेत डिजिटल शाळेची संकल्पना सोपी करून सांगण्यात आली. शिवाय शिक्षकांनी स्वत: सुमारे 28 हजारांचा निधी स्वकमाईतून दिला. गावाचे सरपंच नंदकिशोर जाधव यांनी आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर जाधव यांनी प्रत्येकी 30-30 हजारांची मदत केली. सधन पालकांनी प्रत्येकी 1000 रुपयांची तर इतरांनी 500 रु. ,200 रु. अशी जमेल तेवढी मदत केली. कौतुकाची बाब म्हणजे या सभेत सगळ्यात पहिल्यांदा एका मजुराने देणगी देण्याची तयारी दाखविली आणि मग सगळ्या गावानेच लोकसहभाग दिला.
या लोकसहभागातून शाळेत कॉम्प्युटर, प्रोजेक्टर, प्रिंटर, इन्व्हर्टर या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या. स्वतंत्र डिजिटल वर्गखोली असून याच लोकसहभागातून ती सुरेख रंगविलेली आहे. पहिली ते आठवीच्या वर्गांचे वेळापत्रक बनवून रोज एकेका वर्गाचे विद्यार्थी या डिजिटल अभ्यासक्रमाचा उपयोग करून घेतात.

भविष्यातील योजनांविषयी बोलताना काटे सर सांगतात, ‘डिजिटल शाळेवर आणि टॅब क्लासवर पालक खूष आहेत. दुसरीच्या वर्गाची प्रगती पाहून आता आठवीचा वर्गही टॅब क्लास बनविण्याचा आम्हा शिक्षकांचा विचार सुरू आहे. काही पालकांचा तर पूर्ण शाळाच टॅब स्कूल बनवा, असा आग्रह आहे. अर्थातच यात आर्थिक बाबीही महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्याने संपूर्ण शाळा टॅब स्कूल बनविण्याचा प्रयत्न करीत आहोत.’
लेखन: स्नेहल बनसोडे–शेलुडकर